कारंजात पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची मागणी

Fri 12-Jun-2026,10:03 PM IST -07:00
Beach Activities

कारंजात पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची मागणी

"पालकमंत्री साहेब, कारंजात या हो... आमची गाऱ्हाणी ऐका हो!"

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

कारंजा (घाडगे) : कारंजा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी कारंजा येथे जनता दरबार अथवा ‘जनसंवाद’ कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी नागरी संघर्ष समितीसह विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अनिल निनावे यांच्यामार्फत पालकमंत्र्यांना पाठविण्यात आले.

कारंजा (घाडगे) हा जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असून वर्धा मुख्यालयापासून लांब अंतरावर असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना पालकमंत्र्यांपर्यंत थेट पोहोचणे कठीण जाते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना शेती, रोजगार, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण तसेच वन्यप्राण्यांच्या त्रासासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तालुक्यातील नागरिकांना आपली गाऱ्हाणी थेट पालकमंत्र्यांसमोर मांडता यावीत आणि प्रलंबित प्रश्नांना गती मिळावी, यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारंजा येथे ‘जनसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीजजोडणी, पीकविमा, अवकाळी पाऊस व वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे, ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा योजना, घरकुल व अधिकृत पट्ट्यांचे प्रश्न, आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे, शैक्षणिक अडचणी तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभांतील अडथळे यांसारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

कारंजा शहरातील विकासकामे, आरोग्य व शिक्षण सुविधांशी संबंधित प्रश्नही अद्याप प्रलंबित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री नियमितपणे वर्धा येथे जनता दरबार घेत असले तरी कारंजा तालुक्यातील अनेक नागरिक तेथे पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्वतः कारंजा येथे येऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जनतेच्या हिताचा विचार करून आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून कारंजा (घाडगे) येथे लवकरात लवकर ‘जनसंवाद’ कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी नागरी संघर्ष समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.